केडीएमसी आयुक्तपदी हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती
कल्याण : कलम भूमी,प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हा जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती गेल्या आठवड्यात झाली होती त्यामुळे केडीएमसीचे आयुक्त पद रिक्त झाल्याने नव्या आयुक्त पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते या कडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आठवड्याभराच्या कालावधीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी हिंगोली जिल्हाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात
आल्याचे राज्य शासनाने परिपत्रक काढून या बदलीची माहिती दिली आहे
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांची १ एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी पदी बदली झाल्याने हे पद आठवडाभर रिक्त होते. त्यांच्या रिक्त झालेल्या आयुक्त पदी शासनाने हिंगोली जिल्हाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे परिपत्रका नुसार माहिती दिली आहे.
अभिनव गोयल हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे मेरठ येथील आहेत. यांचे आई-वडील हे डॉक्टर असून आजोबा हे भौतिक शास्त्राचे तर आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका राहिल्या आहेत. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात आयएएस परीक्षा ३६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गोयल यांनी कानपूर आयआयटी मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.
२०१८ ला नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ पदी ,मग त्यांनी धुळ्याचे जिल्हाधिकारी पदाचा पदभार सांभाळला. त्या नंतर गेल्या वर्षी २९ ऑगस्ट २०२४ साली त्यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली होती. त्यांनी विविध जिल्ह्यात केलेल्या आपल्या चांगल्या कामाची छाप पाडली असून कल्याण डोंबिवली महापालिकेतही आपल्या कामाची छाप पडतील यात शंका नाही,

