Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी


 दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

मुंब्रा लोकल अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी शोक व्यक्त केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, या अपघातातील १० जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. मुंब्रा स्टेशनजवळ एक वळण आहे. तिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काहीजण खाली पडले तर काहीजण ट्रेनच्या आतमध्ये पडले, असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले की, कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते.  ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरु झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली, मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाचे काम सुरु आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरु असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपं जाईल. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच १२ डब्ब्यांच्या लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तीत करणे तितकेच गरजेचे आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले

रेल्वे प्रवाशांची दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी आहे, या मागणीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. पूर्वी दिवा येथे जलद लोकलला थांबा नव्हता, मात्र आता दिवा येथे जलद लोकल थांबतात, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.