आषाढी एकादशीनिमित्त बिर्ला मंदिरात महापूजा व कल्याणच्या विठ्ठल मंदिरात मंदिर ट्रस्ट द्वारे पूजा व दिंडी चे आयोजन ,
प्रति पंढरीत भक्तीचा महोत्सव
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे शहाड येथील बिर्ला मंदिर आज पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरुन गेले. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली.
पहाटे पाच वाजता अभिषेक, आणि त्यानंतर सहा वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली. मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला. या महापूजेस सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते
विठ्ठलनामाच्या जयघोषात, भक्तांनी आपल्या श्रद्धेचं दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली. बिर्ला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी एक भक्तिपूर्ण, मंगलमय आणि संस्मरणीय पर्व ठरली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली.


