अपूर्ण डी.पी. रस्ता पूर्ण करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपोषण
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा महावीर नगरी समोरील परिसरात डीपी रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झाला आहे. परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाही. वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला गेला नाहीये. या परिसरात तीन मोठे हॉस्पिटल आहेत. मुलांची शाळा आहे. तक्रार करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी पदाधिकाऱ्यांसह हा रस्ता पूर्ण करण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी केडीएमसी प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सचिन बासरे, वंडार कारभारी, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, विजय काटकर, रवींद्र कपोते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खडकपाडा वायले नगर ब प्रभाग क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या या नगरी महावीर हाईटस समोरील मुख्य डि. पी. रस्ता अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आला आहे. याठिकाणी जागा मालकाने डी.पी. रोडच्या जागेत निळे पत्रे मारुन ठेवले आहेत. या डि. पी. रोडचे जागा मालक जगदीश गुप्ता हे पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. परंतु डि. पी. रोडसाठी जागा दिल्यानंतर फेरीवाले अतिक्रमण करुन जागा ताब्यात घेतात केडीएमसीचे संबंधित अधिकारी लेखी स्वरुपात हमी देत असतील कि, कोणतेही फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही तरच मी डी.पी. रस्त्याकरीता जागा देण्यास तयार आहे. असे असताना देखील केडीएमसी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी केला आहे.
या बाबत वेळोवेळी अर्ज निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या अपूर्ण डि.पी. रस्त्यामुळे वाहतुक कोंडी, ध्वनी प्रदुषण, त्यातच वाढत्या फेरीवाल्यांची संख्या यामुळे या परीसरातील सर्व नागरीक त्रस्त असुन केव्हाही मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.


