खोणी वडवली ग्रामपंचायतिचा अभिनव निर्णय : फटाक्यावर संपूर्ण बंदी; वायु प्रदूषणमुक्त ग्रामपंचायतीसाठी पुढाकार
खोणी वडवली पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत ग्रुप ग्रामपंचायत खोणी वडवलीने फटाके विक्री व फोडण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचा ठराव नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सर्वनुमते मंजूर केला आहे. या निर्णया मागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे वायु प्रदूषण मुक्त ग्रामपंचायत घडविणे. ग्रामसभेत याबाबत सविस्तर चर्चा झाली. फटाके फोडल्यामुळे वातावरणात अनेक विषारी वायू सोडले जातात, जे पर्यावरणासाठी आणि आरोग्यास घातक ठरतात. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही प्रकारचे फटाके विक्री अथवा वापर यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व लहान मोठ्या व्यवसाय व ग्रामस्थांना पत्रावद्वारे याबाबत सूचना देण्यात येणार असून फटाके विक्री अथवा वापर आढळल्यास वायू प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण अधिनियम १९८१ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही ठरविण्यात आले आहे. ही बंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आव्हान ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे. वायु प्रदूषण मुक्त चळवळीस गती देण्यासाठी सरपंच उज्वला काळुंखे, ग्रामविकास अधिकारी दिलीप जागरे, उपसरपंच योगेश ठाकरे तसेच सर्व सन्माननीय सदस्या यांनी या ठरावास संमती दिली. या ठरावाला सदस्य हनुमान ठोंबरे यांनी सूचक म्हणून तर जयेश काळोखे यांनी अनुमोदक म्हणून साथ दिली.
