कलम भूमी , कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघटनेच्या मान्यतेने वासिंद शहरात प्रथमच 15 वी राज्यस्तरीय चॉकबॉल पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी होणार असून ही स्पर्धा दिनांक 23 ते 25 मे 2025 रोजी श्रीसंत गाडगे महाराज आश्रम शाळा भातसई येथे होणार आहे. ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशन, न्यू आयडियल स्कुल अँड ज्यु कॉलेज, वासिंद व दिलीप जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित या स्पर्धेचे आयोजक ठाणे जिल्हा व भातसई ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप जाधव हे परिश्रम घेत आहेत.
स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात व कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राहुल अकुल तसेच नवनिर्वाचित सचिव संदीप नरवाडे घेत आहे. महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पुरुष व महिला गटाचे 25 जिल्ह्यानी आपला सहभाग नोंदवला असून अजून ही जिल्हे आपला सहभाग नोंदवतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघटनेचेचे सचिव सुरेश गांधी यांनी दिली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असल्यामुळे ही स्पर्धा अधिकच रंगतदार होणार आहे.
ठाणे जिल्हा संघाचा या गटात दबदबा असून सलग तीन वर्ष या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर असल्यामुळे या वर्षी सुद्धा आपला दबदबा कायम ठेवण्याचे आव्हान संघासमोर असेल. तीन दिवस असणारी स्पर्धा साखळी पद्धतीने चालणार असून त्यानंतर बाद पद्धतीने व अंतिम सामना अशी होणार असून सर्व सामने फ्लड लाईट मध्ये खेळवण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे सचिव संदीप नरवाडे यांनी दिली आहे.
