दक्षिण आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेत डॉली पाटीलची सुवर्ण कामगिरी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याणच्या वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी डॉली पाटील हिने नेपाळ येथे दिनांक २५ व २६ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या दक्षिण आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले आहे. या शानदार कामगिरीनंतर डॉलीची जपान येथे २०२६ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दक्षिण आशियाई देशांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. डॉली हिने आपल्या उत्तम फिटनेस, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक खंबीरतेच्या जोरावर स्पर्धेत आघाडी घेत भारतासाठी हे मानाचे पदक मिळवले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिपीनचंद्र वाडेकर यांनी डॉलीचे मनःपूर्वक अभिनंदन करत, “अशा आंतरराष्ट्रीय यशामुळे संपूर्ण महाविद्यालयाचा अभिमान वाढत असल्याचे सांगत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉलीच्या या विजयाचे श्रेय तिच्या सातत्यपूर्ण सरावाला, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला, व महाविद्यालयाने निर्माण केलेल्या प्रोत्साहनात्मक वातावरणाला दिले जात आहे. बी. के. बिर्ला नाईट कॉलेजने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले असून, डॉलीसारख्या विद्यार्थिनींच्या प्रेरणादायी यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही नवे उद्दिष्ट साध्य करण्याची उमेद मिळते.
