महानगरपालिकेच्या ५/ड प्रभागात स्वच्छतेचे यशस्वी पाऊल – अवघ्या दोन दिवसांत ३३५ टन कचऱ्याचे संकलन
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ५/ड प्रभागात गत २ दिवस राबविण्यात आलेली विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी ठरली आहे. कल्याण पूर्व येथील आत्माराम नगर परिसर, कमलादेवी महाविद्यालय मागील भाग, साईबाबा मंदिर गुजराती चाळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानासमोरील परिसर आणि मंगेशी संस्कार परिसर येथे गेल्या दोन दिवसांत *रात्रीच्या सत्रात एकूण ३३५ टन* कचरा उचलण्यात आला.महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी ही संपूर्ण मोहीम सुमित एल्कोप्लास्ट या घनकचरा व्यवस्थापन एजन्सीमार्फत राबविली.रात्रपाळीतील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी योग्य नियोजन, यंत्रणा आणि मनुष्यबळ यांचा समन्वय साधण्यात आला होता.या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रभाग क्षेत्र ५/ड चे सहायक आयुक्त उमेश यमगर, सुमित एल्कोप्लास्टचे सानु वर्गीस, प्रविण भोईर, युनिट ऑफिसर विकास सोनवणे व सुपरवायझर यांनी विशेष मेहनत घेतली आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोहीम वेळेत आणि गुणवत्तेने पार पडली.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून, स्थानिक रहिवाशांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे आणि नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि कर्मचारी वर्गाच्या मदतीने परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी झाला आहे अशी माहिती ड प्रभागाचे सहा. आयुक्त उमेश यमगर यांनी दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही स्वच्छ भारत अभियानाच्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत आहे. केवळ साफसफाई न करता, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करून शहर स्वच्छतेचा आदर्श उभा करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे.नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी, कचरा वेळेवर व योग्य पद्धतीने द्यावा आणि अशा उपक्रमांना सहकार्य करून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यपूर्ण कल्याण-डोंबिवलीच्या निर्मितीत हातभार लावावा ,असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

