Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन


कल्याण परिमंडलात चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित 

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

 कल्याण : वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. कल्याण परिमंडलांतर्गत सर्वच मंडल कार्यालयांमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर आपत्कालीन परिस्थितीत साधनसामग्री व मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिले आहेत.  

अतिवृष्टी, वादळी पाऊस आदींमुळे तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तु, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. यामध्ये वीजखांब वाकतात, वीजतारा तुटतात किंवा लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने, त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थींग केल्याची खात्री करून घ्यावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी अॅल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातुची तार वापरावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावित. विशेषतः ग्रामीण भागात विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. विजेचे खांब किंवा तारांजवळ कपडे वाळत घालू नयेत.

वीज ग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस् कॉल दिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा संदेश ९९३०३९९३०३ या महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.

याशिवाय कल्याण परिमंडलातील कल्याण मंडल एक आणि दोनसाठी (कल्याण पूर्व व पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, टिटवाळा) ८८७९६२६१५१, वसई मंडलासाठी (वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा) ७८७५७६०६०२, पालघर मंडलासाठी (बोईसर, डहाणू, जव्हार, पालघर, मोखाडा, सफाळा, तलासरी, विक्रमगड) ९०२८१५४२७८ हे नियंत्रण कक्षाचे क्रमांक ग्राहकांच्या तक्रारी व धोक्यांची सूचना देण्यासाठी उपलब्ध आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.