काळू नदीच्या पुरामुळे दहा गावांचा शहराशी संपर्क तुटला;
रुंदे पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामीभागात जनजीवन विस्कळीत
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पावसाचे पाणी घरात आणि शेतांमध्ये शिरल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे हाल सुरू आहेत.रूंदे गावाजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने फळेगाव, रूंदे, उशिद, हाल, मढ, पळसोली, काकडपाडा, दानबाव, आंबिवली, आराळे आणि भोंगळपाडा या १० ते १२ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आज सकाळपासूनच दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले असून चाकरमानी, व्यापारी, रिक्षाचालक, दूध व भाजीपाला विक्रेत्यांचे हाल होत आहेत. वेळेवर नोकरीवर पोहोचता न आल्याने कामावर परिणाम झाला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.सध्या प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे स्थानिक लोक पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत. प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
