पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली अग्निशमन दलाच्या बोटीद्वारे खाडीमध्ये पाहणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज अग्निशमन दलाच्या बोटीतून कल्याणच्या खाडीमध्ये पाहणी केली आणि यावर्षीच्या पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवल्यास अग्निशमन दलाच्या तयारीचा आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी आढावा घेतला.
अद्याप पावसाळा सुरु होण्यापूर्वीच मे महिन्यापासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवल्यास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून कशाप्रकारे व्यवस्थापन केले जाईल याचा लेखी अहवाल अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी यापूर्वीच सादर केला आहे. या अहवालानुसार अग्निशमन दलाची तयारी कितपत आहे याचा आज आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रत्यक्षात आढावा घेतला. तसेच अग्निशमन दलाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे कशाप्रकारे बचावकार्य केले जाऊ शकते याचीही माहिती घेतली. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त वंदना गुळवे, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, सहा आयुक्त धनंजय थोरात, अग्निशमन केंद्र अधिकारी विनायक लोखंडे उपस्थित होते.
पावसापूर्वी आणि पावसाच्या दरम्यान कोणतीही घटना घडू शकते यासाठी आपला रिस्पॉन्स टाईम चांगला होण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली. आपला रिस्पॉन्स टाईम जितका चांगला असेल तितक्या लोकांचे आपण प्राण वाचवू शकतो. तसेच अग्निशमन दलाची बोट आणि इतर यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत की नाही याचेही मॉकड्रिल दुर्गाडी गणेश घाटावर घेण्यात आल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.*

