हिंदी सक्ती विरोधात कल्याणमध्ये ठाकरे गट व मनसे एकत्र हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची केली होळी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण : कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखे बाहेर आज शिवसेना ठाकरे गट, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले. यावेळी हिंदी सक्तीच्या अध्यादेशाचे कागद फाडत त्यांची होळी केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी आणि मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्यात हिंदी सक्ती केल्या नंतर राजकिय वातावरण चांगलेच तापले असून हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित येऊन 5 जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना शाखे समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पोस्टर देखील झळकवण्यात आले. आंदोलनात सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचे परिपत्रक फाडत त्याची होळी करत, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया अशा आशयाचे बॅनर झळकवत आंदोलन केले. जो
यावेळी दोन्ही नेत्यांनी हिंदी सक्तीचा निषेध व्यक्त केला असून सरकारची ही दडपशाही कदापी सहन केली जाणार नाही. दोन्ही पक्षांची विचारधारा हि एकच असल्याने 5 जुलै च्या मोर्च्यात कल्याण मधील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले.



