महावितरणच्या दुर्लक्षामुळे गरोदर महिलेचा जीव टांगणीला
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण पत्रीपूल परिसरात एका गरोदर महिलेचा जीव अक्षरश टांगणीला लागला आहे. महिलेच्या घरावर मागील काही दिवसांपासून एक मोठं झाड कोसळण्याच्या स्थितीत असून, ते हटवण्यासाठी तिच्या कुटुंबाने महावितरण कार्यालयाकडे वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली होती. मात्र या सध्या कामासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्यात आल्याचा आरोप केला आहे. पीडित गरोदर महिलेने स्वतः व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे हे प्रकरण उजेडात आणले असून, तिच्या म्हणण्यानुसार विज खंडित करून झाड हटवण्याच्या कामासाठी तिने कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दिले. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी झाड कापण्यासाठी २५ हजार रुपये लागतील अशी मागणी करत टाळाटाळ केली.
ही बाब समजताच स्थानिक पत्रकार महावितरणच्या कल्याणमधील टाटा पॉवर कार्यालयात पोहोचले. घटनेची चौकशी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले, मात्र त्यांना कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ थांबवण्याची जबरदस्ती, तसेच "आयकार्ड दाखवा", "व्हिडिओ कॅमेरे अधिकृत असावेत", "पोलिसांना बोलावतो" अशा धमक्या दिल्या. या प्रकरणामुळे महावितरण अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, एका गरोदर महिलेच्या सुरक्षिततेशी खेळ करून पैसे कमावण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली.
या प्रकरणी अधिकार्याच्या विरोधात पत्रकारांनी वीज वितरण कंपनीचे मुख्यालय गाठले. अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांची भेट घेऊन अधिकार्याच्या उद्धट वर्तनाविरोधात तक्रार केली. संबंधित अधिकाऱ्याला समज देण्याचे आश्वासन अधिक्षक अभियंता थोरात यांनी दिले आहे.


