थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण व खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गरजू थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान केले. थॅलेसेमिया हा एक गंभीर रक्तविकार असून, या आजाराने ग्रस्त रुग्णांना नियमितपणे रक्ताची आवश्यकता असते.या गरजेला ओळखून रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते. रविवारी झालेल्या शिबिरात सुमारे ५४ युनिट रक्तदान झाले त्याचप्रमाणे 1 जुलैला डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म नं. १ येथेही शिबीर घेण्यात आले होते त्यामुळे १५ दिवसांत सुमारे १२५ युनिट रक्त जमा झाले.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे प्रकल्प प्रमुख रो. गौतम दिवाडकर, रो. प्रफुल्ल क्षीरसागर, उपप्रमुख रो. अनिल अग्रवाल, रो. तेजस्विनी पाठक यांनी दोन्ही शिबिरांचे चोख नियोजन केले होते. त्याचबरोबर ही दोन्ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना, इनरव्हील क्लब ऑफ कल्याण, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स, रोटरॅक्ट क्लब ऑफ अचीवर्स कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ न्यू कल्याण यांची मोलाची साथ मिळाली.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. धिरेन्द्र सिंह; तसेच, खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचे प्रमुख श्री उमेश बोरगावकर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा उपक्रमांत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.


