भिवंडी येथे 357 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी मंडळ डोंबिवली झोन 35 ए अंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, टेमघर पाडा, भिवंडी येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तब्बल 357 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 286 पुरुष तर 71 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले आणि जे. जे. महानगर रकटपेढी मुंबई यांनी रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.
संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते नामस्मरण करून या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भिवंडीचे माजी नगराध्यक्ष मदन नाईक, माजी नगरसेवक दीलीप गुळवी, सुमीत पाटील, शिवसेना युवासेना प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभुदास नाईक, शिवसेना उपतालुकाप्रमुख मोहन गायकवाड, पिंपळनेर माजी सरपंच अनंता पाटील, डॉ. अमोल बीडकर, डॉ. लक्ष्मण पेंडू, डॉ. अंकित यादव, डॉ. गणेश गोरे, भिवंडी पोलीस अमोल पवल, भिवंडी महानगरपालिकेतील दिनेश भोईर आदी मान्यवरांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले.
मंडळाचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिटच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. दरम्यान रक्तदानाची जनजागृती जन सामन्यात व्हावी यासाठी भिवंडी शहरातील विविध परिसरात, विविध ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी तीन टप्प्यांत बाईक रॅली, जनजागृती रॅली देखील काढण्यात आली होती. यामध्ये संगमपाडा, कामतघर, देवजी नगर, टेमघर, ब्राम्हण अळी, माणकोली, वळ गाव, भरोडी, सारंग गाव, आलीमघर, पिंपळनेर, पिंपलास, कोनगाव, गोवा गाव, गोवा नाका, सरवली, पिंपळघर, रांजनोली, कासपाडा, टाटा आमंत्रा आदी परिसरांचा समावेश होता.


