देशातील पहिली 'भ्रष्टाचार महापालिका' ठरलेल्या KDMCमध्ये लाचखोरांची चढती भाजणी – अटक झालेले पुन्हा कामावर येणार का ,?
कलम भूमी , कल्याण प्रतिनिधी,
कल्याण – केडीएमसी म्हणजे "कल्याण डोंबिवली भ्रष्टाचार महापालिका" अशी ओळख निर्माण होण्यास महापालिकेतील प्रशासनच जबाबदार ठरत आहे. लाच घेताना रंगेहाथ पकडलेले अधिकारी काही दिवसांतच पुन्हा सेवेत रुजू होतात, हे धक्कादायक वास्तव सध्या समोर आले आहे. त्यामुळे लाचखोरीला आळा बसण्याऐवजी भ्रष्टाचाऱ्यांना उत्तेजनच मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांत KDMCच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. डेगूरकर आणि सहकारी सुरेश जाधव यांनी आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी २० हजारांची लाच घेतली, तर सहायक अभियंता रविंद्र आहिरे यांनी एका विकासकामासाठी ४० हजारांची मागणी केली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.
परंतु आश्चर्य म्हणजे, याआधी अटक झालेल्या अनेक अधिकाऱ्यांना काहीच दिवसांत पुन्हा कामावर घेण्यात आले आहे!
महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४७ अधिकारी-कर्मचारी लाच प्रकरणांत अडकले आहेत, ही बाबच पुरेशी धक्कादायक आहे. पण त्याहीपेक्षा अधिक धक्कादायक म्हणजे त्यांना पुन्हा कामावर रुजू करून 'सिस्टमच भ्रष्ट आहे' हेच सिद्ध केले जात आहे.
भ्रष्टाचाराला अभय – चांगल्या कर्मचाऱ्यांना अन्याय!
अनेक प्रामाणिक अधिकारी-कर्मचारी आजही ताटकळत असताना, लाचखोरांना पुन्हा खुर्चीवर बसवले जात आहे. अशाने प्रामाणिकपणाचा अपमान आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे.
जनतेचा संताप उफाळला – 'भ्रष्टाचारमुक्त KDMC' केवळ घोषणा की फसवणूक?
जनतेत प्रचंड नाराजी आहे. वारंवार लाचखोरीच्या घटना घडूनही KDMC प्रशासनाने आतापर्यंत ठोस पावले उचललेली नाहीत. भ्रष्टाचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई करून काही दिवसांनी त्यांना पुन्हा सेवेत घेणे म्हणजे, "चोरीला शासनाचा शिक्का" अशी स्थिती आहे.
जनता विचारते – KDMCमध्ये प्रामाणिक लोकांची जागा आहे का, की फक्त लाचखोरांचेच राज्य राहणार?
प्रशासन गप्प – भ्रष्टाचाऱ्यांना खुले समर्थन
