क. डों. महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आता "घर घर संविधान
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
महाराष्ट्र शासनाचा "घर-घर संविधान" हा उपक्रम शालेय शिक्षण विभागामार्फत नोव्हेंबर 2024 पासून राबविला जात आहे.क.डों. मनपा अंतर्गत क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरूच आहे परंतु त्याचे विस्तृत स्वरूपामध्ये रूपांतर करून तो सर्व शाळांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचावा या उद्देशाने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नुकतेच मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये कल्याण डोंबिवली मनपाच्या एकूण 60 शाळांच्या मुख्याध्यापकांना बोलविण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन नूरखा पठाण सर, संविधान अभ्यासक (सुजाण नागरिक संस्था माणगाव) तसेच माणगाव पंचायत समिती, माणगाव ,जिल्हा रायगड , यांनी केले.शिक्षण विभाग, पंचायत समिती माणगाव अंतर्गत हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविला गेला आणि संविधानाचे महत्त्व हे नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचविले यासंदर्भात त्यांनी सर्वांना अवगत केले आणि क.डों.मनपा क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये सुद्धा हा उपक्रम तसाच राबविला जावा या संदर्भात मार्गदर्शन केले.
क.डों.मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी समिती गठीत केली असून सर्व सीआरसी प्रमुख आणि सर्व मुख्याध्यापक यांना या कार्यक्रमाचे नियोजन करायला सांगितलेले आहे.
"घर घर संविधान" हा उपक्रम, मनपा क्षेत्रात संविधानाचे महत्त्व सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे यामुळे विद्यार्थी तसेच पालक सुद्धा आपल्या संविधानाच्या बाबतीत जागरूक होतील अशी माहिती विजय सरकटे यांनी यावेळी दिली
