कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या ‘घराघर तिरंगा’ अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देशभक्तीची भावना जागविणारे अनेक नवे उपक्रम राबविण्यात आले.
महापालिकेच्या परिक्षेत्रातील शाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या देशातील पोलिस बांधव आणि शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वतःच्या हस्ताक्षरातील भावपूर्ण “आभार पत्र” लिहिले. या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र दक्ष राहणाऱ्या, डोक्यावर हेल्मेट व हातात शस्त्र घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांप्रती आणि सीमारेषेवर तैनात राहून देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांप्रती आपले प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त केला.
पत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिले की, “आपल्या शौर्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. तुम्ही आपल्या प्राणांची पर्वा न करता देशासाठी लढता, कधी कधी बलिदानही देता. तुमच्या सेवाभाव, त्याग आणि देशप्रेमाला आम्ही सलाम करतो.”सीमेवरील जवानांच्या त्यागाची, पोलिस बांधवांच्या सेवाव्रती वृत्तीची, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या निःस्वार्थ कर्तव्याची विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत मांडणी केली. हा उपक्रम केवळ आभार व्यक्त करण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि कृतज्ञतेची भावना दृढ करणारा ठरला.महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांकडून आलेल्या या “आभार पत्रां”मुळे पोलिस आणि जवानांच्या मनातही आनंद व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे समाजातील सुरक्षा दलांबद्दलचा सन्मान अधिक वृद्धिंगत झाला असून, लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजविण्याचे एक सुंदर उदाहरण प्रस्थापित झाले आहे

