कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : महायुती सरकारमधील काही मंत्र्यांकडून सातत्याने होत असलेल्या बेजबाबदार व बेताल वक्तव्यांच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विशेषतः “पत्ते खेळणारा मंत्री” y “वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री” अशा उल्लेखांद्वारे संबंधित मंत्र्यांची वेषभूषा करून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
डोंबिवली पूर्व येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी बॅनर, लुगडी व बॉक्सिंग ग्लोव्हज वापरून प्रतिकात्मक पद्धतीने निषेध व्यक्त केला. रस्त्यावर पत्ते खेळत आणि घोषणाबाजी करत महायुती सरकारविरोधात जोरदार आंदोलन रंगले. यावेळी बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसीकडून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आलेल्या "चिकन मटन विक्री बंदी" निर्णयावरही जोरदार टीका केली. स्वातंत्र्य दिन हा लोकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याचा दिवस असून, काय खावे आणि काय खाऊ नये हे प्रत्येक नागरिकाचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे हा लोकशाहीविरोधी निर्णय असल्याचे ते म्हणाले.यावेळी डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, कल्याण ग्रामीणसह परिसरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अंगीकृत संघटनांचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनात घोषणाबाजी, निषेध फलक, प्रतिकात्मक पोशाख आणि मोठ्या जनतेचा सहभाग पाहायला मिळाला.


