तीन नगरसेवक गेले तरी काँग्रेस ‘किंग मेकर’ – सुरेंद्र आढाव
भाजपकडे ताकद नाही; बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा”
कल्याण : डोंबिवलीतील काँग्रेसमधील तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी काँग्रेसला याचा कणभरही फटका बसणार नाही, असा ठाम दावा काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव यांनी केला आहे.
“हे नगरसेवक आधीच दोन वर्षांपूर्वी मनाने भाजपमध्ये गेलेले होते, फक्त शरीराने काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांचा आता झालेला प्रवेश काँग्रेससाठी तोटा नाही. उलट येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच कल्याण-डोंबिवलीत ‘किंग मेकर’ ठरेल,” असे आढाव म्हणाले.भाजपवर थेट हल्ला
भाजपला सत्तेवर येण्यासाठी स्वतःचे संख्याबळ कधीच नसल्याचा आरोप करत आढाव म्हणाले,
“२०१४ मध्ये भाजपने शिवसेनेच्या मांडीवर बसून सत्ता मिळवली होती. आता आमचा महापौर बसेल, अशा घोषणा करत आहेत. पण आम्ही थेट चॅलेंज देतो – बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा. जनता त्यांना त्यांच्या जागी बसवेल.”संतोष केणे यांच्यावर कारवाईची तयारी
दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव संतोष केणे यांनी माजी आमदार संजय दत्त यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसमध्ये संताप उसळला.
जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर म्हणाले,
“संजय दत्त हे ४५ वर्षांहून अधिक काळ पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत. पक्षाच्या आदेशाने त्यांनी स्वतःची आमदारकी सोडून पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. देशभर पक्षासाठी काम करणाऱ्या दत्तांवर टीका करणारे मात्र फक्त आपल्या दोन मुलांसह फिरतात. त्यांचा पक्ष संघटनेत कोणताही सहभाग नाही. म्हणूनच केणे यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार आहे.”“
भाजप जनतेला फसवते” – कांचन कुलकर्णी
महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला.
“भाजपकडे लोकांमध्ये जाण्याची ताकदच नाही. त्यामुळे ते मत चोरायचा डाव आखतात. आमचा महापौर, आमचा मुख्यमंत्री – अशा घोषणा करून ते जनतेची फसवणूक करतात. काँग्रेसने समाजात स्थान दिलेल्या नगरसेवकांनी अमिषाला भुलून भाजपमध्ये जाणे म्हणजे विश्वासघातच आहे,” असे त्या म्हणाल्या.
“जाणारे जाऊ द्या, नवे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील” – सचिन पोटे
कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन पोट
यांनी ठाम भूमिका मांडली.
“आज देशभर काँग्रेस नेते राहुल गांधी अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. अशा काळात भाजपकडे जाणारे कार्यकर्ते पक्षाशीच नाही तर लोकशाहीशी गद्दारी करत आहेत. पण जाणारे जाऊ द्या, हजारो नवे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होतील आणि काँग्रेस पुन्हा उंच भरारी घेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
