कल्याण-डोंबिवली महापालिकेचा 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका सध्या चर्चेत असून, संपूर्ण महाराष्ट्रात विविध माध्यमांतून 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर मोठी चर्चा रंगली आहे. या निर्णयाला मटण विक्रेते संघाकडून तीव्र विरोध होत असून, काही राजकीय पक्षांकडून देखील विरोध व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, 1988 साली महापालिकेने राज्य शासनाच्या अधिनियमाच्या आधारे हा निर्णय घेतला होता आणि तो आजपर्यंत परंपरेने पाळला जात आहे. नवीन असा काही निर्णय घेतलेला नाही, तर जुनाच निर्णय अंमलात आणला जात आहे.राज्य शासनाने स्थानिक पातळीवर
कत्तलखाने बंद ठेवण्याचा किंवा अन्य निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेला दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही कत्तलखाने मालक व खातीक समाजाच्या प्रतिनिधींनी 15 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या मुख्यालयासमोर मटणाचे दुकाने लावण्याचा इशारा दिला आहे.
तथापि, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला असून, तो काटेकोरपणे अंमलात आणला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

