कल्याण तालुक्यात ठाकरे गटाला जबर धक्का, भाजपा खिंडार पाडण्यात यशस्वी
उपजिल्हाप्रमुख सदाशिव सासे, जि.प. सदस्या जयश्री सासे, सुवर्णा भगत यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला,
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटाचे ठाणे ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख सदाशिव सासे, ठाणे जिल्हा परिषद सदस्या जयश्री सासे, अंबरनाथच्या जि.प. सदस्या सुवर्णा राऊत, तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे.
मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पक्ष प्रवेशात उपतालुका प्रमुख कैलास धुमाळ, तालुका समन्वयक प्रदीप वारे, जेष्ठ कार्यकर्ते अनंता जाधव, रायते सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन निर्मला सासे, कुंदा सेवा सहकारी संस्थेचे संचालक शिवाजी भोईर, सामाजिक कार्यकर्ता शरद सासे, आह्ने भिसोळ ग्रामपंचायतीच्या सदस्या जिजाबाई वाघमारे यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये दाखल होत, "कल्याण-अंबरनाथ तालुक्यात आता भाजपाचा डंका वाजणार" असा संदेश दिला.
या वेळी भाजपच्या वतीने आमदार किसन कथोरे, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रविंद्र घोडविंदे, टीडीसी बँक ठाणेचे संचालक राजेश पाटील, कल्याण ग्रामीण अध्यक्ष शेखर लोणे, समाजसेवक दिनेश कथोरे, सरचिटणीस नेताजी भोईर, युवा कार्यकर्ता सुयोग मगर यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय हिशेब बदलणार का?
ठाकरे गटातील महत्त्वाच्या चेहऱ्यांचा भाजपात झालेला प्रवेश हा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणेच बदलून टाकणार, असा कयास वर्तवला जात आहे.

