कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसाची स्थिती नियंत्रणात
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिकेच्या मुख्यालयातील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) मधून परिस्थितीचा आढावा घेतला.
या वेळी अतिरिक्त आयुक्त ओनंती परदेशी, आपत्कालीन नियंत्रण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, उपायुक्त समीर भुमकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
आज सकाळी कल्याण-डोंबिवली परिसरात जवळपास ७४ मिमी पावसाची नोंद झाली असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.
जलनिस्सारणासाठी तत्काळ उपाययोजना
शहरातील महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी क्षेत्रावर तैनात असून, जेथे वॉटर लॉगिंग होत आहे तेथे पाणी साचू नये यासाठी तातडीने कारवाई सुरू आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यास नागरिकांसाठी खबरदारी घेण्यात येत आहे तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना अन्नपदार्थ व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट घोषित केल्यामुळे, महापालिका आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की –
- अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
- आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या टोल-फ्री क्रमांकावर (18002333045 / 18002333492) संपर्क साधावा. ही माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकृतरीत्या दिली असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

