घराघर तिरंगा" अभियानाअंतर्गत शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत "घराघर तिरंगा" या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांची अंमलबजावणी आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण उपआयुक्त संजय जाधव तसेच शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत मनपाच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी रंगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा विविध प्रकारांमधून आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल असलेले प्रेम व अभिमान सर्जनशीलतेच्या माध्यमातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या तिरंग्याच्या विविध रूपांनी परिसर भारावून गेला.
रंगोळी व चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पक व आकर्षक कलाकृती सादर केल्या. तर प्रश्नमंजुषा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिक्षक वर्गानेदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत त्यांचा ज्ञानसंपदा समृद्ध केली.
या उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे आणि "आपला तिरंगा" याबाबत माहिती समृद्ध करणे होय. या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय प्रतीकांबद्दल आदर, तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक गडद झाली.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये हे उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायक पद्धतीने राबवले गेले. शिक्षण विभागाचे हे प्रयत्न निश्चितच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे ठरले आहेत.

