पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व OMG बुक ऑफ रेकॉर्ड्सची नोंद
कल्याण-डोंबिवली महापालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगारक चतुर्थी, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी कै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त सभागृह येथे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री गणेश मूर्ती बनविण्याची भव्य कार्यशाळा पार पडली. या उपक्रमात महापालिकेच्या शाळा, खाजगी व विनाअनुदानीत शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले.
सकाळी आठ वाजल्यापासूनच सभागृह चिमुकल्यांच्या आनंदी किलबिलाटाने गजबजून गेले होते. एकाग्रतेने, कलात्मकतेने आणि उत्कटतेने बाप्पाच्या मूर्ती घडवणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनीही मनापासून केले."
हरित बाप्पा, फलित बाप्पा" – पर्यावरण जनजागृतीचा संदेश
महापालिका आयुक्तांनी सांगितले की, या कार्यशाळेचा उद्देश शालेय स्तरावरच पर्यावरणपूरक मूर्ती प्रतिष्ठापनेची भावना रुजवणे व नागरिकांना पर्यावरण संतुलन जपण्यासाठी प्रेरित करणे हा होता. क्षितीज गतीमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या सर्जनशीलतेने सुंदर मूर्ती साकारून विशेष कौतुक मिळवले.
जागतिक विक्रम मोडीत
बेंगळुरू पोल्यूशन कंट्रोल बोर्डाचा ३,३०८ मूर्तींचा जागतिक विक्रम मोडून या कार्यशाळेत तब्बल ४,६५७ विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्ती साकारल्या. ही ऐतिहासिक नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व OMG बुक ऑफ रेकॉर्ड्स सीमा मान्नीकोथ यांनी प्रमाणित केली. कार्यशाळेत एकूण ५,२४५ सहभागींनी "पर्यावरण संरक्षणाची शपथ" घेतली, ज्याची नोंदही OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली.
उस्थित मान्यवर व मार्गदर्शक
अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, उपआयुक्त संजय जाधव, समिर भुमकर, वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहा.आयुक्त प्रीती गाडे, हेमा मुंबरकर, राजेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मूर्तिकार सचिन गोडांबे, मिनल लेले, शेखर ईश्वाद, संतोष जांभुळकर, गुणेश अडवळ यांनी मूर्ती घडवण्याचे मार्गदर्शन केले.
यशाचे श्रेय
या उपक्रमाच्या यशासाठी पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे व त्यांच्या टीमने, तसेच एज्युकेशन टुडे फाउंडेशनचे भरत मलिक आणि वृंदा भुस्कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले
.



