केडीएमसी क्षेत्रांतील विविध समस्यांवर बहुजन समाज पार्टीचा आवाज बुलंद
केडीएमसी क्षेत्रांतील विविध समस्यां
दलित वस्त्यांच्या मूलभूत गरजांपासून ऐतिहासिक स्मारक संरक्षणापर्यंत अनेक मागण्या आयुक्तांसमोर
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील तातडीच्या समस्या, ऐतिहासिक स्मारकांचे जतन आणि सामाजिक न्याय यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर बहुजन समाज पार्टीने आज जोरदार पावले उचलली. बसपा प्रदेश सचिव व ठाणे जिल्हा प्रभारी सुदाम गंगावणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन बहुआयामी मागण्यांची यादी सादर केली.
या शिष्टमंडळात कल्याण शहर उपाध्यक्ष विजय सोनवणे, शहर सचिव बाळू भोसले, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रदीप सोनवणे, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष गौतम कांबळे, शहर अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, पश्चिम विधानसभा सचिव मंगेश ओव्हळ, मोहने शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
मुख्य मागण्या — विकासासोबत न्याय आणि संरक्षण
शिष्टमंडळाने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये खालील बाबी विशेषत्वाने ठळक होत्या —
डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पुनर्स्थापन
कल्याण पूर्व 'ड' प्रभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या दर्शनी भागात, पुनालिंक रोड दिशेने पुन्हा स्थापित करावा.
-
निकृष्ट बांधकामावर कारवाई :
दोषपूर्ण काम करणाऱ्या ठेकेदाराचे उर्वरित बील तत्काळ थांबवावे आणि सखोल चौकशी करावी. -
आंबेडकर उद्यानाचा विकास :
1962 मध्ये स्थापन झालेल्या कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यानाचे विस्तारीकरण, सुशोभीकरण करून ऐतिहासिक घटनेचे स्मारक उभारण्याचा प्रशासकीय ठराव शासनाकडे पाठवावा. -
दलित वस्त्यांतील सुविधा पूर्ण करणे :
मूलभूत सोयी — पाणी, रस्ते, गटारे, वीज — तातडीने पूर्ण कराव्यात. -
नवीन प्रभाग रचना व लोकसंख्या प्रमाण :
आगामी निवडणुकीत एससी-एसटी प्रवर्गाच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची वाढ करण्यात यावी. -
MNHRA कायद्याची अंमलबजावणी :
महाराष्ट्र शासन धोरणाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. -
रुग्णालये पुन्हा सुरू करणे :
शास्त्रीनगर व रूक्मिणीबाई रुग्णालयातील बंद प्राथमिक केंद्रे त्वरित कार्यान्वित करून आवश्यक सुविधा पुरवाव्यात. -
एसी/एसटी अधिकारी-कर्मचारी संरक्षण :
मानसिक शोषणाविरोधात निष्पक्ष चौकशी करून संविधानिक संरक्षण द्यावे. -
नगररचना विभागातील स्थिर अधिकाऱ्यांच्या बदल्या :
वर्षानुवर्षे एकाच विभागात असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात. -
बुद्धभूमी फाऊंडेशनची जागा संरक्षित करणे :
रस्ता रुंदीकरणामुळे बाधित जागेचा योग्य मोबदला संस्थेला देण्यात यावा. -
सीमांकनातील अन्यायावर कारवाई :
कल्याण पश्चिमेतील आरटीओ ते बीके नगर रस्ता रुंदीकरणादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या बंगल्याला वाचवण्यासाठी चुकीचे सीमांकन करून मागासवर्गीयांची घरे तोडली गेली. यावर चौकशी करून सीमांकन नव्याने करावे.बसपाची ठाम भूमिका
बैठकीदरम्यान बसपाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, या मागण्या केवळ राजकीय नाहीत तर सामाजिक न्यायाशी निगडित आहेत. "दलित वस्त्यांचा विकास, ऐतिहासिक स्मारकांचे रक्षण आणि समानतेच्या तत्त्वांचे पालन हे प्रशासनाने प्राधान्याने करणे आवश्यक आहे," असे प्रदेश सचिव सुदाम गंगावणे यांनी सांगितले.ही भेट केवळ निवेदनापुरती मर्यादित नसून, बसपाने इशारा दिला आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल. पुढील काही दिवसांत या विषयावर स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे.

