आरोपी डॉक्टर दाम्पत्य अजूनही मोकाट – पोलिस व सरकारचा ढिसाळ कारभार
कल्याण : लोकांच्या जीवाशी निगडित असलेल्या पवित्र डॉक्टरी पेशेला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली असतानाही पोलिस व सरकार बेफिकीरपणे झोपल्यासारखे वागत आहेत. कल्याणमध्ये मेडिकल स्टोअरच्या आमिषाखाली डॉक्टर आणि फार्मासिस्टकडून तब्बल ७० लाखांची फसवणूक करणारे आरोपी डॉक्टर प्रसाद साळी आणि त्यांची पत्नी वैशाली प्रसाद साळी हे आजही मोकाट फिरत आहेत.
करार करूनही पैसे परत नाही – पीडितांचे हाल सुरू
डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी आरोपींच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चेकद्वारे ७० लाख रुपये दिले. तीन महिन्यांत रुग्णालय सुरू करण्याचे करार असूनही वर्ष उलटले, तरी ना रुग्णालय उभं राहिलं ना पैसे परत मिळाले. उलट आरोपी दाम्पत्याने टाळाटाळ करून पीडितांना मानसिक छळ दिला.
पोलिसांचा शोध की दिखावा?
या घटनेला काही महिने उलटले तरी खडकपाडा पोलिस आरोपींपर्यंत पोहोचलेले नाहीत. मोठ्या रकमेचा इतका मोठा गुन्हा उघडकीस येऊनही आरोपींचा शोध अजून लागला नाही, यावरून पोलिसांची कार्यक्षमता आणि सरकारची गुन्हेगारांबाबतची बेपर्वाई उघड झाली आहे. प्रश्न असा की, साध्या नागरिकांना पोलिस ताबडतोब अटक करतात, पण कोट्यवधींची फसवणूक करणारे तथाकथित डॉक्टर अजूनही पोलिसांच्या हाती का लागत नाहीत?
सरकार मौन का धरते?
फसवणूक झालेल्या पीडितांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, परंतु सरकार व प्रशासन गप्प बसले आहे. आरोग्यसेवेच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जनतेच्या पैशांची लूट करणारे आरोपी अजून फरार राहणे हे थेट प्रशासन व सरकारच्या उदासीनतेचे उदाहरण आहे.
जनतेत संताप
डॉक्टरी पेशावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेला धक्का बसला आहे. पैशांचा गोरखधंदा करणारे बनावट डॉक्टर मोकाट फिरत असताना पोलिस व सरकारची निष्क्रियता पाहून नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक होत आहे. या प्रकरणात तातडीने अटक करून आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
