“मी कल्याणकर सामाजिक संस्थेची” तीव्र हरकत – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार नोंदवली
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : आंबिवली येथे प्रस्तावित सिमेंट ग्राइडिंग युनिटला राज्य सरकारने दिलेला मूक पाठिंबा हा स्थानिक जनतेच्या जिवाशी थेट खेळ असल्याचा गंभीर आरोप मी कल्याणकर सामाजिक संस्थेने केला आहे. संस्थेचे अध्यक्ष व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी या प्रकल्पाविरोधात कल्याण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवली आहे.
उल्हास व काळू नद्यांचे पाणी आधीच गंभीर स्वरूपात प्रदूषित असल्याचे मंडळाच्या अहवालात स्पष्ट असून, ते पिण्यायोग्य नाही हे शासनालाच ठाऊक आहे. तरीदेखील त्याच नदीकाठी प्रदूषणकारी सिमेंट ग्राइडिंग युनिट सुरू करण्याच्या हालचालींना परवानगी देण्याचा प्रकार म्हणजे ठाणे जिल्ह्यातील ६० ते ७० लाख लोकांच्या आरोग्याशी राज्य सरकार खेळत आहे, असा संतप्त आरोप निकम यांनी केला.
निकम मागील दहा वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लढा देत आहेत. त्यांनी ४८ दिवसांचे आमरण उपोषण, पाण्याविना पाण्यात उपोषण, धरणे अशा कठोर आंदोलनांद्वारे शासनाला गारद केले. तरी प्रत्येक वेळी सरकारने केवळ तोंडी आश्वासने देत लोकांची फसवणूक केली आहे.
आता मात्र एनआरसी कंपनीच्या जागेत पी अॅण्ड एम सोल्यूशन, उत्तरप्रदेश या सल्लागारामार्फत हा प्रदूषणकारी प्रकल्प रेटून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शनिवारी सार्वजनिक जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु स्थानिकांना पुरेशी माहिती न देता ही जनसुनावणी गुपचूप पद्धतीने उरकण्याचा डाव रचला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
संस्थेने स्पष्ट केले की – “या प्रकल्पामुळे उल्हास व काळू नदी अधिक प्रदूषित होणार असून, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठाच धोक्यात येईल. त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ नये. अन्यथा लोकांचे जीव धोक्यात आल्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर राहील.”
