Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शाश्वत-सुरक्षित इमारत’

 


शाश्वत-सुरक्षित शहर घडविण्यात गृहसंकुलांची भूमिका महत्त्वाची – महापालिका आयुक्त अभिनव गोयल

सोसायट्यांशी थेट संवाद साधणारे पहिले आयुक्त !

कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,

स्मार्ट शहर म्हणजे केवळ तंत्रज्ञान वा पायाभूत सुविधा नव्हे; तर त्यामध्ये राहणारे नागरिक स्मार्ट असतील तेव्हाच ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते. शहर शाश्वत आणि सुरक्षित नसेल, तर त्याची प्रगती शक्य नाही,” असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले.

महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत - यांत्रिकी) प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम येथील मोहन अल्टीझा गृहसंकुलात प्रथमच ‘शाश्वत-सुरक्षित इमारत’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले की, या मुद्द्यांवर प्रभावी काम करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने मानांकन व प्रोत्साहनपर फायदे दिले जातील. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सुरुवातीला समज दिली जाईल आणि आवश्यकतेनुसार आर्थिक दंडही लावला जाईल.

“नागरिकांच्या छोट्या-छोट्या सवयींमुळे शहरात मोठा बदल घडवून आणता येतो. प्रत्येक सोसायटीपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमापूर्वी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोहन अल्टीझा सोसायटीतील घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या आयुक्तांनी थेट सोसायटीत जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही समाधानाची भावना निर्माण झाली आहे. आयुक्त अभिनव गोयल हे केवळ प्रशासनिक अधिकारी म्हणूनच नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे दूरदृष्टीचे प्रशासक म्हणून उदयास आले आहेत.

या समयी उपआयुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, महापालिकेचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, अशोक घोडे, शैलेश मळेकर, जितेंद्र शिंदे, सहा. आयुक्त प्रिती गाडे, धनंजय थोरात, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा आणि सचिव मुकेश उत्तमानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.