रस्त्यावरील खड्ड्याकडे दुर्लक्ष – "हात जोडा" आंदोलनाचा इशारा : माजी नगरसेवक निलेश शिंदे यांची महापालिकेला झोडपणी
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निष्क्रियतेचा कळस गाठला आहे. शहरातील पाणीटंचाई आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न भीषण स्वरूप धारण करत असताना महापालिका अधिकारी डोळे झाकून बसले आहेत. नागरिकांचे हाल होत असून अपघातांचा धोका वाढला आहे, तरीही प्रशासन हलगर्जीपणे हातावर हात ठेवून बसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शिवसेना (शिंदे गट) चे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत स्पष्ट इशारा दिला आहे की, "जर सात दिवसांत रस्ते आणि पाण्याच्या समस्येवर ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही महापालिकेच्या गाफिल कारभाराविरोधात 'हात जोडा आंदोलन' उभारणार. नवरात्रासारखा मोठा उत्सव तोंडावर असताना नागरिकांना हे दु:ख का भोगावे? प्रशासन इतके बेजबाबदार का आहे?"
निलेश शिंदे यांनी रोखठोक शब्दात म्हटले की, "महापालिकेला नागरिकांच्या जीवाशी खेळण्याची सवय झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही अद्याप एकही ठोस पाऊल उचललेले नाही. हे निष्क्रिय अधिकारी नागरिकांच्या कराच्या पैशावर पगार घेतात, पण काम शून्य! जर महापालिकेला जबाबदारी नसेल, तर नागरिकांनी त्यांना 'हात जोडून' घरी पाठवावे."
कल्याण पूर्व परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. प्रशासनाला झोपेतून उठवण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे शिंदे यांनी ठणकावले आहे.
