डीएमसी सुरक्षा रक्षकाची याचिका उच्च न्यायालयात फेटाळली
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक सुरेश पवार यांनी दाखल केलेली फौजदारी गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पवार यांच्यावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात खाजगी महिला सफाई कामगाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासंदर्भात पवार यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंची युक्तिवाद ऐकून याचिका फेटाळली. परिणामी संबंधित गुन्ह्याची चौकशी व पुढील न्यायालयीन कार्यवाही नियमित पद्धतीने सुरू राहणार आहे.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, पवार यांच्यावर दोन दखलपात्र आणि दोन अदखलपात्र असे एकूण चार गुन्हे नोंदवलेले आहेत. त्यामुळे विभागीय चौकशीची आवश्यकता असल्याचे तक्रारदार पक्षाने सुनावणीदरम्यान मांडले.
दरम्यान, न्यायालयीन निर्णयानंतर स्थानिक नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाने तटस्थ भूमिका घेऊन शिस्तभंगात्मक पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
