सरकार आणि प्रशासनाचे डोळे झाक – गणेश विसर्जनात भक्तांची लूटमार
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
भक्तीभावाने केलेल्या गणेश विसर्जनातही सरकार व प्रशासनाने उघडपणे मूकसंमती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कल्याण पूर्व नांदिवली तलावात गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी जय बजरंग क्रीडा मंडळाकडे ठेका देऊन मंडळांवर जबरदस्तीने तीन हजारांची वसुली करण्यात आल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.
समभाव मित्र मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र प्रसाद यांनी महापालिका आयुक्त व पोलीस उपायुक्तांना दिलेल्या तक्रारीत, विसर्जनाच्या बैठकीत स्पष्ट ठराव असूनही ठेकेदारांनी मंडळांची लूट केल्याचे नमूद केले आहे. एवढेच नव्हे तर गणेश मूर्तीची विटंबना झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भक्तीचा उत्सव लुटीचे साधन बनवणाऱ्या ठेकेदारांना प्रशासनाचा आशिर्वाद आहे का, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
महापालिका आणि पोलीस यंत्रणा फक्त कागदोपत्री बैठका घेऊन जबाबदारी झटकत आहेत, पण प्रत्यक्षात भक्तांना जबरदस्तीने पैसे मोजावे लागत आहेत.
धार्मिक भावनांशी खेळ, मूर्तीची विटंबना आणि उघडपणे आर्थिक लूट – हे सर्व काही सरकार व प्रशासनाच्या ढिलाईमुळे होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
भक्तांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणाऱ्या या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
