श्री गजानन महाराज ट्रस्टची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच लाखांची मदत — सेवाभावाची अखंड परंपरा जपणारे कार्य
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या संकटाच्या काळात श्री गजानन महाराज शेगांव भक्त मंडळ, कल्याण यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची परंपरा जपत पुढाकार घेतला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश खैरनार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे रु. पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.
शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आर्थिक दिलासा देण्याचे हे पवित्र कार्य ट्रस्टच्या समाजसेवेतील दृढ निष्ठेचे आणखी एक उदाहरण आहे. या उपक्रमात कल्याणकरांनीही सढळ हस्ते सहभाग नोंदवला असून समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन दिलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री गजानन महाराज ट्रस्ट, कल्याण हे संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून गरीब, गरजू व वंचित घटकांसाठी निःस्वार्थीपणे कार्यरत आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, तसेच आपत्तीग्रस्त भागातील तातडीची मदत अशा अनेक सेवाकार्यातून ट्रस्टने आपली "सेवाच धर्म" ही परंपरा कायम राखली आहे.
“श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे,” असे अध्यक्ष गणेश खैरनार यांनी यावेळी सांगितले.
श्री गजानन महाराज ट्रस्ट, कल्याण यांची ही उदार मदत केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक दिलासा देणारी ठरत असून, समाजातील सेवाभावी कार्याची प्रेरणा देणारी ठरली आहे.

