2७ गावातील कामगारांना मिळाला न्याय – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाचे कौतुक
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या २७ गावातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व पगाराच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून, महापालिकेच्या प्रशासनाने जलद निर्णय घेत कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. या ऐतिहासिक पावलामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र प्रशासनाच्या कार्याचे कौतुक होत आहे.
महापालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात माजी आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त अभिनव गोयल, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कामगारांचे सामावेशन आदेश वितरित करण्यात आले. यावेळी उपस्थित कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाची लखलखती झलक दिसून आली.
एकूण ३२१ कामगारांना सामावेशन आदेश देण्यात आले असून, यामध्ये शिपाई, बहुद्देशीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, तांत्रिक व विविध विभागातील कर्मचारी यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून हक्कासाठी लढा देणाऱ्या कामगारांना आज न्याय मिळाल्याने प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.महा पालिका प्रशासकीय उपायुक्त वंदना गुळवे यांच्या प्रामाणिक प्रयत्नाने कामगारांना योग्य न्याय मिळाल्याने कामगार वर्गात आनंदाची लाट पसरली असल्याचे मत कामगार व्यक्त करत आहे,
महापालिकेच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाने ही प्रक्रिया केवळ वेळेत पूर्ण केली नाही तर पारदर्शकतेने निर्णय घेऊन कामगारांचा विश्वासही जिंकला आहे. या उपक्रमामुळे कामगारांना स्थैर्य लाभणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे.
याबाबत कामगार संघटनांनी व विविध सामाजिक संस्थांनी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले असून, “दीर्घकाळ न्याय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या कामगारांचा आवाज ऐकून त्यांना तातडीने सामावून घेणे ही प्रशासनाची लोकाभिमुख भूमिका आहे” अशा शब्दांत कौतुक व्यक्त केले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये उत्साह, आनंद व प्रशासनाबद्दल विश्वास दुणावला आहे.
