कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : बौद्ध धर्मातील चिंतन, करुणा आणि साधनेचा त्रिमूर्ती संगम ठरलेली वर्षावास धम्म प्रवचन मालिका — भारतीय बौद्ध महासभा, नालंदा बुद्ध विहार शाखा, सम्राट अशोक नगर, उंबर्डे रोड, कल्याण (प.) येथे तीन महिन्यांपासून सुरू होती. या आध्यात्मिक साधनेचा सांगता समारंभ मंगळवारी शाखाध्यक्ष राजू काऊतकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत मंगल वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय शिक्षिक प्रा. डॉ. आर. आर. कसबे गुरुजी यांनी उपस्थित राहून धम्मप्रेमी बांधवांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात “धम्म म्हणजे फक्त श्रद्धा नव्हे, तर जीवनाचे शिस्तबद्ध आणि समतामूलक आचरण आहे” असे प्रतिपादन करत सर्वांना सदाचार, मैत्री आणि करुणेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
शाखेचे अध्यक्ष राजू काऊतकर, साहेबराव मगरे, प्रतिभा शिरसाट, स्वाती आघाम, शरद गोंडगे यांच्या उपस्थितीत गेल्या तीन महिन्यांपासून चाललेल्या या प्रवचन मालिकेत सहकार्य करणाऱ्या व सहभाग घेणाऱ्या सर्व साधकांचा सन्मान करण्यात आला.
१० जुलै २०२५ रोजी आषाढ पौर्णिमेला प्रारंभ झालेल्या या वर्षावास प्रवचन मालिकेत प्रत्येक रविवार आणि पौर्णिमेला धम्मविचारक, आचार्य, व बौद्ध तत्त्वचिंतक यांनी विविध विषयांवर प्रवचने दिली. धम्म, प्रज्ञा, करुणा व सम्यक जीवनपद्धती या विषयांवर झालेल्या प्रवचनांनी साधकांच्या अंतर्मनात ज्ञानदीप प्रज्वलित केला.
वर्षावास हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून आत्मशुद्धीचा आणि मनशांतीचा धम्म पर्व आहे. नालंदा बुद्ध विहारातील हा वर्षावास सोहळा बुद्ध, धम्म आणि संघाच्या त्रिरत्नात श्रद्धा अधिक दृढ करणारा ठरला.
“अप्प दीपो भव — स्वतःचा दीप बना” या तत्त्वविचाराला साकारत नालंदा बुद्ध विहाराने या वर्षावासात धम्माची उपासना, साधना आणि समाजसेवेचे एकत्रीकरण साधले, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

