कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
कलम भूमी ,कल्याण प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचाही समावेश आहे. या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार सन २०२५–२६ या कालावधीतील महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा निश्चित
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या नियमांनुसार लागू राहणार आहे.
खर्च नोंदवही ठेवणे बंधनकारक
निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या निवडणूक खर्चाची तपशीलवार नोंद ठेवणे बंधनकारक असून, सदर खर्चाची नोंद नियमितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या खर्च निरीक्षकांकडे सादर करावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासन सज्ज
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततामय व नियमबद्ध पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या निवडणुकांमुळे शहराच्या राजकीय वातावरणाला पुन्हा एकदा चैतन्य येणार असून, नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

