मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कल्याणमध्ये शिवसेना–मनसे युतीच्या उमेदवारांशी महत्त्वपूर्ण भेट; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
कल्याण प्रतिनिधी, कलम भूमी,
कल्याण : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये शिवसेना–मनसे युतीच्या उमेदवारांशी महत्त्वपूर्ण व धावती भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पॅनल क्रमांक ९ अंतर्गत मधील युतीचे उमेदवार रूपेश चंद्रकांत भोईर, शुभम बांगर, उमिला तांबे आणि सोनल पवार यांनी राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवडणूक रणनिती, स्थानिक प्रश्न, प्रचाराची दिशा तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. राज ठाकरे यांनी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करताना “एकसंघ ताकदीने, सकारात्मक अजेंड्यावर निवडणूक लढवा” असा ठाम संदेश दिला.
या भेटीनंतर मनसे व शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. “राज ठाकरे आमच्या पाठीशी” या भावनेतून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत, फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. अनेक कार्यकर्त्यांनी ही भेट म्हणजे युतीसाठी मोठा टर्निंग पॉईंट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज ठाकरे यांच्या या सक्रिय सहभागामुळे कल्याणमधील निवडणूक रंगतदार होणार असून, शिवसेना–मनसे युती अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. येत्या काळात प्रचारात आणखी वेग येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
एकंदरीतच, या भेटीमुळे युतीच्या उमेदवारांचे मनोबल उंचावले असून कल्याणमध्ये विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे चित्र आहे.

