क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेत भावपूर्ण अभिवादन
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
कल्याण शहराच्या सामाजिक जाणीवा आणि परिवर्तनाच्या परंपरेला उजाळा देत आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील वंचित, शोषित घटकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान क्रांतीवीराच्या स्मृतीपुढे शहराने कृतज्ञतेने नतमस्तक होत त्यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे कार्य हे सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमान यांचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” महापौरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घ्यावा, असेही आवाहन केले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे व रामदास कोकरे, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता संदीप तांबे, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, नगरसेवक राजाराम पावशे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे तसेच अधिकारी-कर्मचारी, नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी क्रांतिवीरांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून कृतज्ञ अभिवादन केले.
सामाजिक क्रांतीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या लहुजी साळवे यांच्या विचारांप्रती शहराचा दृढ सन्मान आणि बांधिलकी यावेळी प्रकर्षाने जाणवली. त्यांच्या त्याग, धैर्य आणि समतेच्या संदेशाने समाजात नवी प्रेरणा जागृत होऊन सामाजिक ऐक्य अधिक दृढ व्हावे, हीच भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


