लाड-पागे समिती लागू – वारस हक्कांतर्गत 237 जणांना नियुक्तीपत्रांचे वितरण
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी,
महापौर, उपमहापौर व प्रशासनाचा स्तुत्य पुढाकार; सफाई कामगारांच्या कुटुंबांना दिलासा
कल्याण : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वारस हक्काच्या प्रकरणांना अखेर न्याय मिळाला असून लाईड-पागे समितीअंतर्गत वारस हक्काने नियुक्तीपत्रांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्याचा आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महापालिकेने केले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षली चौधरी यांच्या हस्ते तसेच उपमहापौर आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी या संपूर्ण प्रक्रियेसाठी अथक प्रयत्न करत तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
प्रशासनाच्या माहितीनुसार, एकूण सुमारे 237 नियुक्तीपत्रांचे तीन टप्प्यांत वितरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 66 प्रकरणांपैकी 12 लिपिक, 11 शिपाई आणि 43 सफाई कामगारांना नियुक्ती देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 114 जणांमध्ये 24 लिपिक, 36 शिपाई, 1 सर्व्हेअर आणि 55 सफाई कामगारांचा समावेश होता. तिसऱ्या टप्प्यात 66 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून त्यात सफाई लिपिकांचाही समावेश आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना महापौर हर्षली चौधरी यांनी सांगितले की, “सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या वारसांना रोजगाराची संधी देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना सुखाचा आधार मिळाला आहे.”
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनीही या प्रक्रियेत पारदर्शकता व गती राखण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने सर्व प्रकरणांची बारकाईने छाननी करून नियमांनुसार नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे.
उपायुक्त वंदना गुळवे यांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून वेळेत निर्णय घेतले.
या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेकांनी महापौर, उपमहापौर आणि प्रशासनाचे आभार मानले. शहराच्या विकासासोबतच कामगार कल्याणाला प्राधान्य देणारा हा निर्णय प्रशंसनीय ठरत आहे.


