केडीएमसी महासभेत ‘स्थायी समिती’सह महत्त्वाच्या विषयांवरून राजकीय वातावरण तापणार
कोट्यवधींच्या खर्चाच्या प्रस्तावांवरही होणार जोरदार चर्चा
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) ची सर्वसाधारण महासभा १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका भवनातील सभागृहात होणार असून, या सभेत मांडण्यात येणाऱ्या विविध विषयांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थायी समितीच्या सदस्य निवडीपासून ते कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावांपर्यंत अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
महासभेच्या अजेंड्यावर एकूण १० महत्त्वाचे विषय ठेवण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे “स्थायी समितीची रचना” हा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार पालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यावर कोणाचा वरचष्मा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या जागांवरून राजकीय रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
याशिवाय महासभेत महिला व बालकल्याण समिती आणि शिक्षण समितीच्या स्थापनेचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या समित्यांमध्ये सदस्य निवडीवरूनही राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, महासभेत शहरातील विकासकामांसाठी मोठ्या निधीचे प्रस्तावही मंजुरीसाठी येणार आहेत. त्यामध्ये
सुमारे ४ कोटी ९१ लाख २८ हजार ७६८ रुपयांचा खर्च असलेला प्रस्ताव,
तसेच ४ कोटी ३८ लाख रुपयांचा दुसरा विकासकामांचा प्रस्ताव,
आणि ६६ लाख ३१ हजार ५०४ रुपयांचा प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित खर्चाचा प्रस्ताव
असे कोट्यवधी रुपयांचे विषय महासभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. या खर्चावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच महापालिका भवन परिसरातील परिसर विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याबाबतचा विषयही सभेत मांडला जाणार आहे. याशिवाय शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचा मुद्दाही चर्चेत येणार आहे.
महासभेत शहरातील तलावांचे सुशोभीकरण, देखभाल आणि अतिक्रमणमुक्ती या विषयांवरही चर्चा अपेक्षित आहे. या सर्व विषयांमुळे महासभेत सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सभागृहात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
महासभेत मांडण्यात येणाऱ्या स्थायी समितीच्या रचनेपासून ते कोट्यवधींच्या विकासकामांपर्यंतच्या निर्णयांचा शहराच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याने, या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
