कल्याण-मुरबाड मार्गावरील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बळी घेतच राहणार?
RTO व वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त; दोषींवर कारवाई कधी?
कलम भूमी,कल्याण प्रतिनिधी
कल्याण : कल्याण-मुरबाड महामार्गावर वाढलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकत्याच घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हा अपघात केवळ दुर्दैवी घटना नसून, संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, कल्याण (बायपास ते मुरबाड) या मार्गावर मोठ्या प्रमाणात “काळी-पिवळी” टॅक्सी, खासगी वाहनांमधून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त — १५ ते २० प्रवासी — एका वाहनात कोंबले जात असल्याचे चित्र आहे. हे सर्रासपणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असून, प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ केला जात आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, महात्मा फुले चौक परिसरासह वाहतूक पोलिस कार्यालयाजवळच ही बेकायदेशीर वाहतूक उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे RTO व वाहतूक पोलिस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी आर्थिक व्यवहार व संगनमतामुळेच ही वाहतूक सुरू असल्याचा संशयही नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये याबाबत प्रचंड रोष निर्माण झाला असून, “प्रशासन झोपेत आहे का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे. वारंवार अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात असताना, संबंधित अधिकारी मात्र कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.
नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की:
बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर तात्काळ बंदी आणावी
दोषी वाहनचालक व मालकांवर कठोर कारवाई करावी
संबंधित RTO व पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी
“जर RTO आणि वाहतूक पोलिसांनी वेळेत आणि प्रामाणिकपणे कारवाई केली असती, तर हे अपघात टाळता आले असते,” अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आता सर्वांच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत —
निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याची ही मालिका थांबवण्यासाठी ठोस पावले कधी उचलली जाणार? दोषींवर कारवाई कधी होणार?

