कल्याण-डोंबिवलीत संविधान मूल्यांचा महोत्सव; ‘संविधान गुण गौरव’ परीक्षेत २.४० लाख विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ‘संविधान गुण गौरव’ परीक्षा ही केवळ शैक्षणिक उपक्रम न राहता संविधान मूल्यांचा जागर निर्माण करणारा एक प्रेरणादायी महोत्सव ठरत आहे. दि. १ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत तब्बल २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून, शिक्षक व पालकांचाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे.
‘घर घर संविधान’ या जनजागृती उपक्रमाला गेल्या १७५ दिवसांपासून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या परीक्षेला भक्कम पायाभरणी मिळाली आहे. प्रशासन अधिकारी भारत बोरनारे आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, समूह साधन केंद्र प्रमुख आणि पालक यांचा सक्रिय सहभाग या उपक्रमाला विशेष उंची देत आहे.
या अंतर्गत नुरखॉं पठाण लिखित ‘आपले संविधान... राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती’ या विषयावरील लेखनाचे मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषांमधून नियमित वाचन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल केवळ माहितीच नव्हे, तर त्याच्या मूल्यांविषयी आस्था आणि जाणीव निर्माण झाली आहे. याच अभ्यासपूर्ण प्रक्रियेचा परिपाक म्हणजे ‘संविधान गुण गौरव’ परीक्षा होय.
या परीक्षेत केवळ विद्यार्थ्यांचे ज्ञान मोजले जात नाही, तर संविधानिक मूल्यांची जपणूक, समता, बंधुता आणि जबाबदारीची भावना यांची रुजवण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. सुमारे ६ हजार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यात जागर निर्माण केली, तर पालकांनीही या उपक्रमात सहभागी होत संविधानाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून, शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण करणारा आहे. विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव, कर्तव्यभावना आणि सामाजिक उत्तरदायित्व विकसित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थी हे केवळ परीक्षार्थी न राहता सजग नागरिक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तर शिक्षक हे ज्ञानासोबत मूल्यांचेही संवाहक म्हणून उभे राहत आहेत.
संविधानाच्या मूल्यांवर आधारित सजग, जबाबदार आणि समतावादी समाज घडविण्याच्या दिशेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा हा प्रयत्न निश्चितच दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.



