कल्याण पोलिसांचा ‘ऑपरेशन क्लीन-अप’ यशस्वी : २१ लाखांचा गांजा जप्त, ३ आरोपी जेरबंद; डीसीपी अतुल झेंडे यांच्या अचूक नियोजनाला मोठे यश
कलम भूमी कल्याण प्रतिनिधी,
अमली पदार्थांच्या विरोधात कल्याण पोलिसांनी राबवलेल्या धडाकेबाज मोहिमेत पुन्हा एकदा मोठे यश मिळवत तब्बल २१ लाख ४० हजार रुपये किमतीचा ९०७ किलो ५० ग्रॅम गांजा जप्त केला असून तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या काळ्या व्यवसायाला जबर धक्का बसला असून पोलिसांच्या धाडस व नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ३) अतुल झेंडे यांच्या अचूक नियोजन, काटेकोर रणनीती आणि सततच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपींना रंगेहाथ पकडले. खडकपाडा पोलिस ठाणे व विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत शिताफीने ही मोहीम यशस्वी केली.
अटक आरोपी:
वसीम नुरजमा खान (३६, भिवंडी)
दिनेश कुमार संजीवन सरोज (३०, ठाणे पश्चिम)
मोहित मेवालाल वर्मा (२७, मुंबई)
पोलिसांनी आरोपींकडून
२१,४०,००० रुपये किमतीचा गांजा
१०,५०० रुपये रोख रक्कम
३ मोबाईल फोन
असा एकूण २१,९१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
प्राथमिक तपासात आरोपी हे अमली पदार्थांची खरेदी-विक्री व वितरण साखळीत सक्रिय असल्याचे उघड झाले असून, या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना ७ मे २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या धाडसाला सलाम
या कारवाईत पोलिसांनी दाखवलेली तत्परता, धाडस आणि अचूक समन्वय उल्लेखनीय आहे. विशेषत: डीसीपी अतुल झेंडे यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे ही कारवाई यशस्वी ठरली. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच आरोपींना अटक करण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कल्याण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अमली पदार्थांविरोधातील लढा आणखी तीव्र केला जाणार असून अशा बेकायदेशीर धंद्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तरुण पिढीला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.5

