शक्तिधाम रुग्णालयातील नवजात मृत्यू प्रकरणी महापालिकेची कडक कारवाई
कथित वैद्यकीय निष्काळजीपणाच्या चौकशीनंतर डॉक्टर सेवामुक्त; आरोग्य सेवा देणाऱ्या एजन्सीवर २५ टक्के आर्थिक दंड
कलम भूमी, गोपाळ शर्मा,
कल्याण पूर्वेतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तिधाम रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याच्या कथित निष्काळजीपणाच्या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर संबंधित डॉक्टर दोषी आढळल्याने त्यांची सेवा तत्काळ प्रभावाने समाप्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या एजन्सीवरही आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी शक्तिधाम रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या नवजात बाळाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणाबाबत गंभीर आरोप करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीअंती त्यावेळी रुग्णालयात कार्यरत असलेल्या संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेबाबत निष्कर्ष नोंदविण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने संबंधित डॉक्टरची सेवा तातडीने समाप्त करण्याचा निर्णय घेतला.
या कारवाईमुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा झाल्यास प्रशासनाकडून कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट संदेश गेला आहे. विशेषतः महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
आरोग्य सेवा देणाऱ्या एजन्सीलाही दंड
या प्रकरणात केवळ संबंधित डॉक्टरवरच कारवाई न करता शक्तिधाम रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविणाऱ्या एजन्सीलाही आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिका उपायुक्त तथा आरोग्य विभागाचे प्रसाद बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित एजन्सीला देण्यात येणाऱ्या एका महिन्याच्या देय रकमेतून २५ टक्के रक्कम आर्थिक दंड म्हणून कपात करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने डॉक्टरची सेवा समाप्त करण्याबरोबरच सेवा पुरविणाऱ्या एजन्सीवरही आर्थिक जबाबदारी निश्चित केल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिल्याचे स्पष्ट होते.
“आरोग्य सेवेत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही”
उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी स्पष्ट केले की, महापालिकेच्या आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. रुग्णांना वेळेवर आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
शक्तिधाम रुग्णालयातील या घटनेनंतर झालेली कारवाई ही केवळ एका डॉक्टरपुरती मर्यादित न राहता संबंधित सेवा पुरविणाऱ्या एजन्सीपर्यंत पोहोचल्याने आरोग्य व्यवस्थेतील जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.
दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने मनपा रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची उपलब्धता, प्रसूती विभागातील व्यवस्था आणि रुग्णसेवेच्या गुणवत्तेचे नियमित निरीक्षण करण्याची गरज असल्याची नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
