लोढा हेवन येथील बेकायदा आठवडी बाजारावर महापालिकेच्या ‘ई’ प्रभागाची धडक कारवाई! महापालिका पथकाला तीव्र विरोध; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळ्याप्रकरणी आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल कल्याण/डोंबिवली : प्रतिनिधी महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारांविरोधात महापालिका प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, लोढा हेवन, निळजे परिसरातील बेकायदा आठवडी बाजारावर महापालिकेच्या ‘ई’ प्रभागाने धडक कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करण्यात आला. काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा तसेच वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी संबंधित आयोजक व जागा मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या आठवडी बाजारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. याच कारवाई मोहिमेअंतर्गत ‘ई’ प्रभाग क्षेत्रातील लोढा हेवन, निळजे येथील ग्रीन पार्क टॉवरच्या मागील बाजूस दर शुक्रवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारावर शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी संयुक्त कारवाई करण्यात आली. फेरीवाला नियंत्रण पथकाची संयुक्त मोहीम सहा. आयुक्त सचिन तामखेडे यांच्या अधिपत्याखाली मुख्यालयातील फेरीवाला नियंत्रण पथक आणि ‘ई’ प्रभागातील फेरीवाला पथक यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. महापालिकेचे पथक कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचताच बाजारातील काही फेरीवाल्यांनी तसेच संबंधित जागा मालक राजा पाटील यांच्याकडून कारवाईला विरोध करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. कारवाई थांबविण्यासाठी काही व्यक्तींनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. यावेळी जमावाच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. एवढेच नव्हे तर महापालिका पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. पोलिसांच्या मदतीने कारवाई पूर्ण परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तत्काळ पोलिसांची मदत घेतली. पोलिसांच्या उपस्थितीत आणि सहकार्याने कारवाईस होणारा विरोध मोडून काढण्यात आला. त्यानंतर सदर अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्यात आला. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध करणे तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी संबंधित आयोजक आणि जागा मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अनधिकृत बाजार आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे. अतिरिक्त आयुक्तांची घटनास्थळी भेट दरम्यान, कारवाईच्या ठिकाणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित ठिकाणी अनधिकृत बाजाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लवकरच विविध संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अनधिकृत बाजारांवर यापुढेही कठोर कारवाईचा इशारा महापालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत आठवडी बाजार, बेकायदा फेरीवाला व्यवसाय अथवा नियमबाह्य अतिक्रमण खपवून घेतले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापुढेही अशा अनधिकृत बाजारांवर नियमानुसार कठोर कारवाई सुरूच राहणार असून, कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा महापालिका कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. लोढा हेवन येथील कारवाईमुळे महापालिकेने अनधिकृत आठवडी बाजारांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, आता शहरातील इतर बेकायदा बाजारांवरही अशीच धडक कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. Kalambhoomi September 07, 2026 लोढा हेवन येथील बेकायदा आठवडी बाजारावर महापालिकेच्या ‘ई’ प्रभागाची धडक कारवाई महापालिका पथकाला तीव्र विरोध; कर्मचाऱ्…