खडेगोळवली वालधुनी नाल्यात भराव – अधिकाऱ्यांची आमदार गायकवाड यांच्याकडून कान उघडणी
आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केली पाहणी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली आणि वालधुनी नाल्यात भराव टाकण्यात आल्याने सांडपाणी वाहून जाण्याचा मार्ग रोखला गेला आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्यातील गाळ काढला गेला नाही तर परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची आणि नागरिकाचे संसार पाण्याखाली जाण्याची भीती आहे. यामुळेच आज या नाल्यातील भरावाची आमदार सुलभा गायकवाड आणि पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी पाहणी करत अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. पुढील आठ दिवसात हा भराव हटवून नैसर्गिक नाल्याचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचना यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांना देण्यात आल्या.
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा यासाठी नालेसफाई करत नाल्यातील गाळ काढला जातो. महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराच्या माध्यमातून नालेसफाई करते. मात्र कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली नाल्याजवळ एम एम आरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी संरक्षक भिंत उभारली जात असून यासाठी नाल्यात भराव टाकण्यात आला आहे. तर दुसरीकडे विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून तिसर्या आणि चौथ्या मार्गीकेचे काम करताना नाल्यात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून नाल्याचा मार्ग रोखण्यात आल्याची बाब आमदार गायकवाड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत हा भराव तातडीने काढून नाल्याचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नाल्यात टाकलेल्या भरावावरून आमदार गायकवाड यांच्यासह शहर अभियंता परदेशी यांनी अधिकाऱ्यांची तसेच ठेकेदारांची चांगलीच कानउघडणी केली. यानंतर पुढील आठ दिवसात संपूर्ण भराव काढून नाल्याचा नैसर्गिक मार्ग मोकळा करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
रेल्वेकडून वालधुनी नाल्यात टाकलेला भराव हटविण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्याबरोबर संयुक्त पाहणी दौरा लवकरच करून त्यांच्या मार्फत हा भराव हटवला जाईल ज्यामुळे पावसाळ्यात नाल्यात पाणी अडकून पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असेहि परदेशी यांनी यावेळी स्पष्ट केले.


