अबिवली रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाला साकडे
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधीन,
कल्याण : अंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी जोरदार मागणी अंबिवली रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी दीपक सकपाळ यांनी केली आहे. यासाठी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव व सरचिटणीस श्याम उबाले यांना त्यांनी लेखी निवेदन सादर केले.
अंबिवली स्थानकावरील पत्र्यांची अवस्था अत्यंत खराब असून पावसाळ्यात संपूर्ण प्लॅटफॉर्म गळतीमुळे ओला होतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पत्र्यांची तातडीने दुरुस्ती वा बदल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानकासाठी मंजूर झालेले सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसविण्यात आलेले नाहीत, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यांची त्वरित बसवणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थनकावर स्वच्छतागृह, मुतारी आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नाही. शहाड स्टेशनवर जसे नविन फॅन व बाकडे बसविले गेले आहेत, तसेच अंबिवली स्थानकावरही लावण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून झाली आहे. शहाड स्टेशनवर झालेली चांगली विद्युत रोषणाई अंबिवली येथे मात्र दिसून येत नाही. अंधारामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, म्हणून पर्याप्त लाइट्स लावाव्यात, असेही सकपाळ यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
अंबिवली स्थानकावर स्वच्छतेचा अभाव असून परिसरात नियमित साफसफाई होणे आवश्यक आहे. तसेच स्थानकावरून लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांना मोठ्या अंतराचा सामना करावा लागतो. त्यामुळे कल्याण स्थानकावर सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म उंची वाढविण्याच्या धर्तीवर अंबिवली स्थानकाचीही प्लॅटफॉर्म उंची वाढवावी, अशीही सकपाळ यांनी जोरदार मागणी केली आहे.
याशिवाय, अंबिवली स्टेशनवर बदलापूरप्रमाणे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था करावी, नवीन तिकीट खिडकी सुरू करावी, तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर असलेला सरकता जिना टिटवाळा दिशेकडून हलवून प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर बसवावा, अशीही सूचना देण्यात आली आहे. प्रवाशांना सोयीस्कर तिकीट सेवा मिळावी यासाठी स्टेशनवर अधिक एटीव्हीएम मशिन्स लावाव्यात, असेही त्यांनी नमूद केले आहे.
रेल्वे रूळांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी बॅरिकेड्स बसविणे, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरपी व आरपीएफ महिला अधिकारी तैनात करणे, तसेच प्रवाशांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या स्थानक कर्मचाऱ्यांना तंबी देणे या मुद्द्यांचा देखील निवेदनात समावेश आहे. शहाड आणि अंबिवली स्थानकावर होणाऱ्या सुविधांतील दुजाभावाबाबतही तक्रार नोंदवून या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा, अशी मागणी सकपाळ यांनी केली आहे. दीपक सकपाळ यांच्या या पुढाकारामुळे अंबिवली प्रवाशांच्या समस्या प्रकाशझोतात आल्या असून रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी जोरदार अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.



