स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेला 'हरित महासिटी कंपोस्ट ' ब्रँड वापरण्यास परवानगी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकेला 'हरित महा सिटी कंपोस्ट ' या शासनाच्या नोंदणीकृत ब्रँड अंतर्गत खताच्या विक्री व विपणनासाठी अधिकृत परवानगी मिळाली आहे. ही परवानगी एक वर्षासाठी देण्यात आली असून, त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मधून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर शेतकऱ्यांसाठी अधिक प्रमाणात करता येणार आहे. महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे ८०० ते १००० मॅट्रिक टन कचरा तयार होतो.
या कचऱ्याचे संकलन करून मोजे उंबर्डे कल्याण पश्चिम येथे ३५० टीपीडी आणि मोठा गाव डोंबिवली पश्चिम येथे १०० टीपीडी येथील प्रकल्पावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पावर तयार होणाऱ्या खताचे नमुने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोग शाळेच्या अहवालानुसार हे खत एफ सी ओ मानकानुसार वापरासाठी योग्य असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर महापालिकेने'हरित महा सिटी कंपोस्ट ' ब्रँड वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र संचालनालयकडे प्रस्ताव सादर केला होता. तपासणी पूर्ण झाल्यानंतर ही परवानगी मंजूर करण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेला स्वतःच्या प्रकल्पामधून सेंद्रिय खताची विक्री व विपणन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच परिसरातील शेतकरी व नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार खत उपलब्ध होणार आहे.

