पलावा काटई उड्डाणपूल ३१ मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार – आमदार राजेश मोरे
आमदार मोरे यांनी केली पुलाची पाहणी
कलम भूमी, डोंबिवली, प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण शिळ मार्गावरील बहुप्रतीक्षेत पलावा काटई उड्डाणपुल ३१ मे २०२५ पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. आज कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पुलाच्या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना आमदार मोरे यांनी दिल्या यावेळी अधिकार्यांनी हि माहिती दिली. कल्याण शिळ मार्गावरील पलावा एक्स्पेरीया येथील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे.
पलावा काटई उड्डाणपूल हा कल्याण शिळ मार्गावरील अतिशय महत्वाचा उड्डाणपूल असून या पुलामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे. यामुळेच या पुलाच्या कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश आज आमदार राजेश मोरे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याबरोबर पाहणी करताना दिले. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बारवकर, कार्यकारी अभियंता निर्तीन बारोळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक बंडू पाटील, जेष्ठ पदाधिकारी दत्ता वझे, कल्याण ग्रामीण संघटक अर्जुन पाटील यांच्यासह इतर अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण शिळ मार्गावरील कोंडी फोडण्यासह वाहतूक सुलभ करण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण आणि आवश्यक तिथे उड्डाणपूल उभारण्याचे काम खासदार डॉ शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरु असून यातील अडथळे दूर करत काम पूर्ण करण्यासाठी खासदार शिंदे यांच्या समवेत आमदार राजेश मोरे प्रयत्न करत आहेत. दिवा पनवेल रेल्वे मार्गावरून जाणार्या या पुलामुळे नागरिकाना सुकर प्रवास करणे शक्य होणार आहे. मागील अनेक दिवसापासून हे काम सुरु असून या पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ३१ मे २०२५ पासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करणे शक्य असल्याचे आश्वासन दिल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले.o

