नर्मदा उत्तर वाहिनी परीक्रमा एक सुखद व अध्यात्मिक विकसित करणारी यात्रा
कलम भूमी, विशेष प्रतिनिधी,
श्री वासुदेव आश्रम वासण, गुजरात. येथे उत्तरवाहिनी परिक्रमा 2025 यावेळत सौ. मेधा कावतकर मैया यांना आलेला दिव्य अनुभव त्यांनी सर्व भक्तांसाठी सांगितला आहे..*
मी मेधा कावतकर. चार वर्षांपूर्वी मोठी पायी परिक्रमा, गेल्या वर्षी मंडला उत्तर वाहिनी आणि ह्या वर्षीच्या ह्या तीन उत्तरवाहिनी परिक्रमा…हे सगळं माझ्याकडून करवून घेणाऱ्या त्या नर्मदा मैय्याचे आभार कसे मानू कळत नाही…
नर्मदा मैय्याने ह्या वर्षीच्या तीन उत्तरवाहिनी परिक्रमा माझ्याकडून सहज करवून घेतल्या…कुठेही कसलाही त्रास झाला नाही…नर्मदा मैय्याबरोबरच यात सर्वात मोठा आधार वासुदेव आश्रम, वासण हा होता कारण मी एकटीने परिक्रमा करणार होते,
ह्या वर्षी तिलकवाडा - रामपूरा येथील उत्तर वाहिनी परिक्रमा करण्याची इच्छा होती तसेच तीन दिवस तीन परिक्रमा करण्याची इच्छा होत होती…पण सर्व आश्रमांमधे ह्या काळात खूप गर्दी असते त्यामुळे तीन दिवस रहायला मिळेल का असा प्रश्न मनात येत होता…नर्मदा मैय्याचा व माझ्या मनाचा कौल घेऊन मी वासुदेव आश्रम, वासण येथील स्वामी विष्णूगिरी महाराजांना फोन केला आणि त्यांनीही येऊ शकता असे लगेच सांगितले तसेच स्टेशनवर पोचल्यावर आश्रमात पोचायची व्यवस्था होईल असे ही सांगितले…त्यांच्या त्या आश्वासक व सकारात्मक शब्दांनी मन हलके झाले,
आश्रमात पोचल्यावर तेथील प्रसन्न वातावरणाने वेगळेच स्पंद जाणवू लागले आणि नर्मदा मैय्याने मला अगदी योग्य ठिकाणी आणले आहे याची जाणीव झाली,
स्वामी विष्णूगिरी महाराज, ज्ञानी, प्रेमळ व्यक्तिमत्व…आश्रमात येणाऱ्या सर्वांची ते काळजीपूर्वक विचारपूस करतात…त्यांच्या मार्गदर्शनानुसार आश्रमातील पूजा व इतर सर्व कार्ये कुठलीही गडबड, गोंधळ न होता सुरळीतपणे चालू असतात… अगदी तरुण ते ८४ वर्षे वयातील साधक येथे प्रेमाने परिक्रमावासीसाठी व्यवस्था पहात असतात,
सकाळच्या चहापासून, नाश्ता, कोकम सरबत, उत्कृष्ट भोजन हे सर्व अन्नपूर्णा माता जयश्री ताई, विभाताई, प्राची ताई आणि त्यांना मदत करणारे सर्वच अगदी प्रेमाने परिक्रमावासींना खाऊ घालत असतात…
ह्या वर्षाच्या माझ्या तीन उत्तरवाहिनी परिक्रमा ह्या सर्वांमुळे सहज झाल्या,
स्वामी विष्णूगिरी महाराज आणि ह्या आश्रमातील सर्वांचेच मनःपूर्वक खूप खूप आभार…नर्मदे हर ।*🙏🙏🙏




